हे विश्वात्मक

हे विश्वात्मक तव भक्ताचा स्वीकारी प्रणिपात
प्रार्थना हीच आज हृदयात॥ध्रु.॥

अन्तरात जी वसे हीनता
मोह असूया आणि अहन्ता
दृढ वज्राने त्यांच्यावरती करि निर्मम आघात॥१॥

सुखात किंवा विपदाकाली
अविचल राहो शान्ति आतली
प्रसन्नतेचे दैवी स्मित रे नित विलसो ओठात॥२॥

इवली शल्ये रुपती खुपती
मात करू दे त्यांच्यावरती
प्रगल्भतेचे पंख देऊनी ने ज्योतिर्जगतात॥३॥

सेवेतच सार्थक गवसावे
जीवशिवाचे मैत्र जुळावे
विश्वच अवघे सिंचित व्हावे स्नेहामृत सेकात॥४॥

आर्तांना हृदयासि धरावे
श्रान्तांसाठी छाया व्हावे
मात्र खलांच्या सत्तेपुढती जुळोत ना कधि हात॥५॥

तू दिधलेले हे तेजोबल
सहज तुझ्या चरणांशी वाहिल
अशी लीनता उमलो आता माझ्या मनमर्मात॥६॥