औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक १९

१९ : प्रबोधिनीच्या शाळांमध्ये वर्ग-शिक्षकाचे काम इतर शाळांपेक्षा वेगळ्या पद्धतीने निश्चित केले आहे का ?

उत्तर :- वर्ग-शिक्षकांनी काय करावे या बाबत विविध बैठकी आणि प्रशिक्षण वर्गांमध्ये बोलणे होते. पण ‘प्रबोधिनीच्या शाळांमध्ये वर्ग शिक्षकांची कामे’ अशी काही यादी निश्चित केलेली नाही. मी वर्गशिक्षकांशी बोलताना पाच मुद्यांच्या आधारे बोलतो. औपचारिक नोंदी, निर्णय लावणे इ. कामांच्या पलीकडे वर्गशिक्षकाने वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची सर्व विषय व उपक्रमांतील कामगिरी पाहात, विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे पुढीलप्रमाणे साहाय्य केले पाहिजे. १) विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे, २) त्याच्या प्रयत्नांची गती वाढवणे, ३) त्याच्या प्रयत्नांचा वेग व दिशा नियंत्रित करणे, ४) दीर्घ काळ काम करणे आवश्यक असताना त्यांचा धीर टिकवणे व ५) त्यांच्या कामाचे चिकित्सक परीक्षण करणे ही पाच कामे प्रबोधिनीच्या शाळेतील वर्ग शिक्षकाने केली पाहिजेत.