आमचे व्यवहार्य आदर्श – ५. सनातनी आणि आधुनिक

गावोगाव इंटरनेटची केंद्रे तयार व्हावीत व कोणालाही स्वस्तात कुठलीही माहिती कोठूनही त्वरित उपलब्ध व्हावी हा Taking informa-tion revolution to the masses चा आपला अर्थही तिथे समजला.

जनमनी विपुल ज्ञान करावे

Taking information revolution to the masses असा संकल्प जाहीर करून गुढी पाडव्याला Prabodhan Infosys Pvt. Ltd. च्या नावाच्या पाटीचे पूजन झाले. जानेवारी १९९६ मध्ये संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या प्रबोधिनीच्या स्नातकांची पहिली बैठक झाली. पहिल्या बैठकीला सुमारे पंधराजण होते. वर्षभरात येऊन गेलेल्यांची संख्या पंचवीसच्या वर असेल. प्रथम दर महिन्याला आणि नंतर आठवड्याला व शेवटी रोजच अनेक प्रश्नांवर उत्तरे शोधत शेवटी सहा जणांनी वरील नावाची कंपनी स्थापन केली. मल्टी-मीडिआ, सीडी-रॉम, इंटरनेट व इंट्रानेट, इंजिनिअरिंग सोल्यूशन्स असे काही शब्द नामफलकाच्या पूजनाच्या वेळी झालेल्या उपासनेनंतर ऐकले, गावोगाव जशी एस्.टी.डी. ची केंद्रे झाली आहेत तशी गावोगाव इंटरनेटची केंद्रे तयार व्हावीत व कोणालाही स्वस्तात कुठलीही माहिती कोठूनही त्वरित उपलब्ध व्हावी हा Taking information revolu-tion to the masses चा आपला अर्थही तिथे समजला. ज्ञान प्रबोधिनी आयुर्विज्ञान संस्थेच्या निमित्ताने प्रबोधिनीच्या स्नातकांपैकी डॉक्टर झालेले काहीजण एकत्र जमून संजीवन रुग्णालयाचे काम सुरू झाले. तसेच वर्धिष्णु काम या नवीन गटाच्या हातून व्हावे, अशीच आपल्या सर्वांची इच्छा असेल.

आधुनिकातले आधुनिक

प्रबोधिनीच्या भवितव्य लेखामध्ये संगणक-क्षेत्रात सॉफ्टवेअर बनविणारा उपक्रम असावा असे लिहून ठेवले आहे. नवीन मनुष्यबळ तयार होते आहे हे पाहिल्यावर तो उपक्रम पाच-सहा वर्षे अलिकडे ओढला. मोठ्या प्रमाणावर उपक्रम करायचा म्हटल्यावर आर्थिक व्यवहारांची लवचिकता व वेग राहावा यासाठी आपल्या स्नातकांच्या गटाने स्वतःच्या जबाबदारीवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी निर्माण करावी असे सुचविले. त्याप्रमाणे ३१ मार्चला कंपनी नोंदवल्याचे प्रमाण-पत्र मिळाले. ज्या क्षेत्रात दर तीन महिन्यांनी अद्ययावत काय हे बदलते आहे त्या क्षेत्रात आधुनिकातले आधुनिक राहाणे अवघड आहे, म्हणूनच हे आव्हान या गटाला स्वीकारावेसे वाटले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत धावावे लागते. तरच आधुनिकातले आधुनिक राहाता येते. इतरांना आपल्यामागे धावावेसे वाटले म्हणजे खरे आपण आधुनिकतेच्या सीमारेषेवर आलो. तसे होणे तर आणखी अवघड आहे. असे आधुनिकतेच्या सीमेवर राहाण्यासाठी स्वतः स्वप्ने पाहावी लागतात. इतर कोणी पाहिली नाहीत अशी स्वप्ने जर आपण पाहिली तर आपण सीमारेषा पुढे सारू शकतो. Taking information revolu-tion to the masses हे असे स्वप्न आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत धावावे लागते. इतरांना आपल्यामागे धावावेसे वाटले म्हणजे खरे आपण आधुनिकतेच्या सीमारेषेवर आलो.

सनातन्यातले सनातनी

आधुनिकातले आधुनिक असूनही सनातन्यातले सनातनी राहाता येईल अशी आपली भूमिका आहे. तसे आम्ही राहाणार आहोत अशी आपली घोषणा आहे. आधुनिकातले आधुनिक म्हणजे सतत धावत राहून अद्ययावत राहणे. सनातन्यातले सनातनी म्हणजे सतत स्थिर राहून अद्ययावत राहणे. काही भूमिका अशा असतात की त्या नेहमीच नव्या ताज्या वाटतात. अशा भूमिका म्हणजे सनातन भूमिका सनातन म्हणजे चिर पुरातन, नित्य नूतन. अतिशय जुन्या काळापासून चालत आलेली आणि नेहमीच अद्ययावत वाटणारी भूमिका.

जे आपल्याला सुचले तेच पूर्वीही अनेकांना सुचले आहे. तेच सनातन, सनातनाला कालानुरूप वेश द्यावा लागतो. म्हणून आधुनिकही असले पाहिजे आणि सनातनीही.

केरळातल्या अय्यप्पा यात्रेचे चित्रण दूरदर्शनवर अनेकांनी पाहिले असेल. केरळमध्येच १९२८ पासून शिवगिरी येथेही एक यात्रा दरवर्षी भरते. केरळमधील एक संत नारायण गुरू यांनी ही यात्रा सुरू केली. ही यात्रा सुरू करताना या यात्रेत काय व्हावे हे त्यांनी डाव्या हाताची बोटे मोजत सांगितले असे वर्णन आहे. एक-शिक्षण, दोन-आरोग्य, तीन-भक्ती, चार-एकात्मता, पाच-शेती, सहा-व्यापार, सात-कुटिरोद्योग, आठ-तांत्रिक कौशल्ये अशा आठ विषयांवर मार्गदर्शन या यात्रेत लोकांना मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या विषयांमध्ये आपल्या लोकांची प्रगती झाली तरच देशात समृद्धी येईल हे त्यांनी सांगितले.

अशी विलक्षण यात्रा सुरू करण्यापूर्वी तीस वर्षे म्हणजे १८९८ मध्ये नारायण गुरूंनी केरळात अस्पृश्यांसाठी मंदिर बांधले. पशूचे बळी आणि दारूचा नैवेद्य दाखवायचा नाही या अटीवर या मंदिरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली. धार्मिक सुधारणांपासून प्रारंभ करून समाजाला समृद्धीच्या मार्गापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. शिवगिरीच्या यात्रेतले ते विषय पाहिल्यावर प्रबोधिनीच्या प्रभागांपैकी अनेक विषय त्यामध्ये सापडतील. जे आपल्याला सुचले तेच पूर्वीही अनेकांना सुचले आहे. तेच सनातन. सनातनाला कालानुरूप वेश द्यावा लागतो. म्हणून आधुनिकही असले पाहिजे आणि सनातनीही.

प्रबोधिनीतले सनातनत्व

संस्कारांचा पुरस्कार, दैनंदिन उपासनेचा आग्रह, सर्व मतमतांतरांमध्ये पूल बांधण्याची भूमिका या काही गोष्टींमध्ये प्रबोधिनीचे सनातनत्व आहे. ‘अविद्यया मृत्युं तीर्त्या विद्यया अमृतम् अश्नुते’ या आपण स्वीकारलेल्या घोषवाक्यामध्ये प्रबोधिनीचे सनातनत्व आहे. ‘अविद्यया मृत्युं तीव’ हे आपण मानत असल्यानेच शिक्षण, उद्योग, व्यापार, ग्रामविकास, आरोग्य, संशोधन, संघटन या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण काम करतो. असा सर्वंकष विचार करण्यामध्ये प्रबोधिनीचे सनातनत्व आहे. आधुनिकातले आधुनिक असणे हा सुद्धा आपल्या सनातनत्वाचा – ‘अविद्यया मृत्युं तीर्वा’ चा भाग आहे. कालमहिम्यामुळे आपण याचा स्वतंत्र उच्चार, विचार आणि आचार करत असतो.

‘अविद्यया मृत्युं तीर्वा विद्यया अमृतम् अश्नुते’ या स्वीकारलेल्या आपण घोषवाक्यामध्ये प्रबोधिनीचे सनातनत्व आहे.