(कार्यकर्त्यांच्या अभ्यासवर्गामध्ये सौर श्रावण २९/२१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रबोधिनीतील मूलतत्त्वांच्या इतिहासाचा मा.संचालकांनी घेतलेला आढावा )
१९८८ साली प्रबोधिनीच्या रौप्य महोत्सवानिमित्त’ज्ञान प्रबोधिनी एक अभिनव शैक्षणिक प्रयोग – खंड ३’असं आपण प्रकाशित केलं.आणि त्याच्यामध्ये ज्ञान प्रबोधिनीची वैचारिक मूलतत्त्वं काय आहेत,यासंबंधीचं लेखन आठ प्रकरणांमध्ये आलेलं आहे.सात तत्त्वांसाठी सात प्रकरणं आणि एक उपसंहाराचं प्रकरण.तेव्हा सात लेखांमध्ये ती मांडणी केलेली होती,आणि त्याला एकत्र ‘तत्त्वसप्तक’ असं म्हणायला सुरुवात झाली.आणि अजूनही ते नाव त्या शब्दाचं मूळ लक्षात न घेता लोक अनेक प्रकारे वापरत असतात.ही लेखमाला ८८ साली प्रकाशित झाली,पण पहिल्यांदी अशी सात तत्त्वांमध्ये मांडणी १९८७ साली व्याख्यानांच्या रूपाने झाली.आणि तसं पाहिलं तर त्याच्या आधी २५ वर्षंही तत्त्वं काय असावीत, कशाला प्राधान्य द्यावं, महत्त्वाचं काय आहे,असा वेगवेगळ्या पद्धतींनी विचार चालू होता.
सुरुवातीला प्रस्तावनेत अभिजित दादांनी म्हटलं की काम करणाऱ्यांनीच विचार केला पाहिजे.काम करणारा एक गट आणि विचार करणारा दुसरा गट असा असता कामा नये.तर आप्पांचं स्वतंत्र प्रतिभेनी काम आधी सुरू झालेलं होतं.मग त्याच्यामध्ये शिवण्याला— वारज्याच्या पुढे जे गाव येते—तिथे गावकऱ्यांनी आणि पुण्यातल्या शहरी युवकांनी मिळून श्रमदानानी मुख्य रस्त्याला जोडणारा जोड रस्ता बांधणं,असं काम पहिल्यांदी केलेलं होतं.त्याची गंमत मला अशी वाटते की,कामं एक प्रकारची असली तरी त्याच्या मागचा विचार वेगवेगळा असू शकतो.
पुण्याच्या पश्चिम भागात शिवण्याला हे काम झालेलं होतं आणि पुण्याच्या पूर्व भागात हडपसरला एस. एम. जोशी वगैरे मंडळींनीयाच पद्धतीचं काम तिथे सुरू केलेलं होतं.आप्पा आणि एस. एम. जोशी हे नातेवाईक, पण वैचारिक दृष्ट्या दोन टोकांवर उभे असलेले असे कार्यकर्ते होते.तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक मोठा दुष्काळ पडलेला होता,आणि दुष्काळ निवारणाचं काम,गुरांसाठी चारा छावण्या उभ्या करणं,त्याच्यासाठी अगदी गुजरातेमधून चारा मागवणं, अशी सगळी कामंही आप्पांनी केलेली होती.आणि या सगळ्या कामांच्याबरोबर ‘राष्ट्रद्रष्टे विवेकानंद’ आणि ‘हरिसिंह नलुआ’ ही चरित्रं लिहिली.कालदृष्ट्या ‘राष्ट्रद्रष्टे विवेकानंद’ आधी. त्याला १९५३ सालचं महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचं पारितोषिक मिळालेलं आहे.आणि त्याच्यानंतर ‘हरिसिंह नलुआ’. त्याला १९५४ सालचं महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचं पारितोषिक मिळालेलं आहे, त्या वर्षातला उत्तम ग्रंथ म्हणून. कालक्रम जरी असा असलातरी चरित्राच्या पलीकडे वैचारिक भूमिका मांडण्याचीसुरुवात ‘हरिसिंह नलुआ’ या चरित्राच्या शेवटी झालेली आहे.
इथे वेगळं एक प्रकरण चरित्रामध्ये शेवटी जोडलेलं आहे.तर राष्ट्रीय एकात्मतेसाठी इतिहास लेखन झालं पाहिजे, असा एक विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे. इतके दिवस आपण शिकलो होतो, प्रांतिक इतिहास शिकलो. तर सगळ्या भारतवर्षाच्या जीवन प्रवाहाचं संपूर्ण ज्ञान व्हायचं असेल,तर मग सगळ्या प्रांतांमधला इतिहास सगळ्या भारतीयांना माहिती असला पाहिजे. आणि त्या इतिहासाच्या ज्ञानातून एकात्मतेचा अनुभव, हा सगळा आपल्या सगळ्यांचा इतिहास आहे, असं वाटलं पाहिजे.प्रांतोप्रांतीचा गौरवशाली इतिहास हा सर्व राष्ट्राचा आहे.आज शिवाजी केवळ मराठ्यांचा, रणजितसिंह केवळ शिखांचा, प्रताप केवळ रजपूत किंवा राजपूत, हरिहर-बुक्क कर्नाटकाचे, त्याच्याऐवजी हे सर्व आमचे, सर्व हिंदुस्थान देशाचे, असा अभिमान तयार झाला पाहिजे, असंही त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून एकात्मता वाढावी, याच्यासाठी मुद्दाम इतिहासलेखन आता आपण स्वतंत्रपणे केलं पाहिजे, अशी एक वैचारिक भूमिका मांडलेली आहे. आणि राष्ट्रघडणीसाठी इतिहासाचं महत्त्व हे त्याच्यामध्ये आलेलं आहे.
‘राष्ट्रद्रष्टे विवेकानंद’ या पुस्तकाच्या शेवटी विवेकानंदांच्या विचारांचं संकलन होतं.पण ते नंतर स्वतंत्रपणे ‘विवेकानंद काय म्हणाले’ म्हणून छापलेलं होतं.आता आपण ते ‘विवेकानंदांचा राष्ट्रधर्म’ या नावाने त्याची तिसरी-चौथी आवृत्ती काढली.पहिल्या-दुसऱ्या आवृत्त्या आप्पांनीच काढलेल्या होत्या.आणि त्या आवृत्तीमध्ये’हिंदू राष्ट्रविवेचन’ म्हणून आप्पांनी जो स्वतंत्र दीर्घ निबंध लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये इतिहासाच्या बरोबर आणखीन संस्कृतीचा अभ्यासही केला पाहिजे,असं म्हटलेलं आहे.हिंदू राष्ट्र जीवनपटाचे आडवे धागे,म्हणजे धर्मबुद्धी, व्यापक तत्त्वज्ञान, सांस्कृतिक विचार हे आहेत.तर उभे धागे राष्ट्राचा अखंडपणे घडत आलेला इतिहास,त्यातील सुख-दुःखे, त्यातील संकटे आणि वैभव प्रसंग, त्यातील यशापयशयाच्या इतका आहेत.मनुष्य हा गुणांइतकाच दोषांनीही परिपूर्ण होतो.उक्तीइतकाच त्याच्या कृतीनेही मोजला जातो,तसेच राष्ट्राचेही आहे.राष्ट्रजीवन हे तत्त्वज्ञान आणि इतिहास या दोहोंनी परिपूर्ण होत असते.असं त्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे.आणखीनही काही विचार आहेत त्याच्यामध्ये,पण मुख्य राष्ट्रघडणीसाठी इतिहास आणि तत्त्वज्ञान,विचार आणि कृती या दोन्हीचाही समावेश झाला पाहिजे असं म्हटलेलं आहे.
मग तिसरं चरित्र आप्पांनी जे लिहिलं ते निवेदितांचं लिहिलं, ‘विवेकानंदकन्या निवेदिता’. १९६१ साली ते चरित्र लिहून झालं पूर्ण. १९५६ ते ६१ आप्पांच्या पीएच.डी.चंही काम चालू होतं, आणि त्याच काळामध्ये हे चरित्रलेखनही चालू होतं. १९६२ मध्ये प्रबोधिनीची स्थापना झाली आणि जानेवारी ६३ मध्ये विवेकानंद जयंतीच्या वेळी हे निवेदिता चरित्र प्रकाशित झालेलं आहे.त्याच्यामध्ये तर स्वतंत्रपणे विचारांची मांडणी त्या चरित्राच्या शेवटच्या प्रकरणामध्ये केलेली आहे.कृतीचा भाग त्याच्यात पुन्हा उल्लेख आलेला आहे.आणि काय काय करण्याची आवश्यकता आहे, तर कोणी विद्यादेवीची उपासना करतील, कोणी शास्त्र संशोधनात अग्रेसर ठरतील, कोणी शासकीय व्यवस्थेत स्वतःला गुंतवतील,पण कलंकित पैशाला स्पर्श करणार नाहीत. कोणी सैन्यात शिरतील, भारताचे सैन्य अद्ययावत करतील, कोणी उद्योगधंद्यात शिरतील, उत्पादनाचे विक्रम घडवून आणतील. कोणी शेतीत शिरतील आणि शेतीला टवटवी आणतील.कोणी सहकारी चळवळींना वाहून घेतील.पण या सगळ्याच्या मुळाशी संघटनवृत्ती हवी. आणि खेड्यातील जीवन संघटित करून तिथपासून तालुके, जिल्हे, प्रांत आणि अखिल भारतीय संघटनाही घडवायची असेल,आणि या संघटनेमध्ये सर्व संघटना आणि सर्व पक्ष यांनी परस्परसहकार्याने काम केलं पाहिजे, अशीही भूमिका मांडून ठेवलेली आहे.
हा सगळा इतिहास घडवण्याचा भाग, म्हणजे इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, एकात्मतेच्या दृष्टीने त्याची मांडणी केली पाहिजे.तसा आज आपण समकालीन इतिहास घडवायचा आहे, त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे ते म्हटलेलं आहे.पण त्याच्याबरोबर असही म्हटलेलं आहे की आजच्या स्थितीला संन्यासाश्रम आणि गृहस्थाश्रम दोन्हीला अर्थ प्राप्त करून देणारा, देव आणि देश यांची एकत्र उपासना शिकवणारा, जुन्या संस्कृतीचे आकंठ पान करून नव्या शास्त्रीय सुसंगत युगाला सुसंगत ठरणारा धर्म आम्हाला हवा आहे.संघटनक्षम आणि विजिगीषू असा धर्म हवा आहे.त्याला विवेकानंदांनी ‘Aggressive Hinduism’ असं म्हटलेलं होतं, निवेदितांनी तो शब्द वापरलेला आहे. आणि त्याच्यामध्ये दैनंदिन उपासना, सामूहिक उपासना, सर्व प्रकारे सगुण साकारापासून निर्गुण निराकारापर्यंतची उपासना आणि त्याच्यातून ईश्वरीय शक्तीचं अवतरण घडवणं, अशा मंत्रद्रष्ट्या ऋषींची आवश्यकता आज देशाला आहे, असंही म्हटलेलं आहे. राष्ट्रविचाराच्या दृष्टीने मग असंही म्हटलेलं आहे की विचारधारा कुठलीही असो—रशिया असेल, जर्मनी असेल, चीन, जपान असेल, ब्रिटन, अमेरिका असेल—विचारधारा वेगळी असली तरी संघटना सगळ्यांना आवश्यक होती किंवा आहे.समाजजीवन संघटित झालं तर त्याच्यामुळे राष्ट्रहित साधता येईल.राष्ट्रहित साधल्यावर अथवा साधता साधता अन्य राष्ट्रांचे हित साधावं, कसं साधावं याचा विचार करता येईल.पण राष्ट्रहित हे कोणाच्याही दृष्ट्या होणे शक्य नाही. पुढे मग एका पद्यामध्ये ‘देश जननी रूप मे ही विश्व जननी दिखती’ असं म्हटलेलं आहे. तो विचार इथे पहिल्यापासून आलेला आहे की, एकदम सगळ्या विश्वाचा विचार, वसुधैव कुटुंबकम् वगैरे,आपल्या देशाचा विचार न करता करता येणार नाही.तर आपल्या देशाच्या संघटनातून, विकसनातूनच आपल्याला विश्वहिताकडे जाता येईल. सर्व मानव्याच्या कल्याणासाठी जायचंय वगैरे असं सगळं म्हटलेलं आहे.तर ही सगळी मांडणी प्रबोधिनीच्या स्थापनेपर्यंत आप्पांच्या मनामध्ये तयार झालेली होती.
मग अर्थातच पाच-सहा वर्षांचा काळ प्रबोधिनीच्या उभारणीचा, कामाचा होता.त्या काळात वैचारिक मांडणी वेगळी स्वतंत्रपणे मुद्दाम केली असेल,तर मला आप्पांच्या दैनंदिनींमध्ये आणि त्यावेळच्या बैठकींच्या टिपणांमध्ये कुठे दिसते ती.सुभाषराव, विसूभाऊ, रामभाऊ कदाचित स्वतंत्रपणे आप्पा काही मांडत असतील तर ते चर्चा सांगू शकतात.पण साधारणपणे ६८-६९ साली तेव्हाच्या युवक कार्यकर्त्यांची जी दर रविवारी रात्री एकत्र बैठक व्हायची, त्या बैठकीत ‘प्रबोधिनीची मूलतत्त्वे’ अशा शीर्षकाखाली काही सलग बैठकी झालेल्या दिसतात.त्याच्या टिपणांची वही मला वाचायला मिळाली.ती कोणीतरी माझ्याकडनं वाचायला घेऊन गेले, अजून मला परत नाही मिळाली ती.पण त्या बैठकीमध्ये प्रबोधिनीची वैचारिक मूलतत्त्वं काय,तर चार शीर्षकांखाली ती सगळी मांडणी झालेली होती आणि त्याच्यावर युवकांची नंतर चर्चाही झालेली होती.आणि तेव्हापासून हेच तत्त्व का आणि याच्याऐवजी हे का नाही, अशाही काही चर्चा त्यावेळी झालेल्या होत्या.तेव्हा ‘धर्मसंस्थापना’ असं एक तत्त्व सांगितलेलं होतं.’हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असं दुसरं तत्त्व सांगितलेलं होतं. ‘संघटनेशिवाय तरणोपाय नाही’ असं तिसरं तत्त्व सांगितलेलं होतं. आणि ‘व्यक्तिविकास आणि कार्यविकास’ एकत्र चालले पाहिजेत, असं चौथं तत्त्व सांगितलेलं होतं.त्यावेळच्या बैठकीची टिपणं पाहिल्यानंतर तेव्हा सलग मांडणी काहीतरी झालेली होती असं दिसतंय.नंतरच्या काळामध्ये त्या तत्त्वांबद्दल आप्पांनी सलग मांडणी केल्याचं मला माहिती नाही.७१ सालापासून मीही रविवारच्या या बैठकीला असायचो.पण या तत्त्वांचा उल्लेख व्हायचा.पण साधारणपणे एकाच मार्गदर्शकांच्या, प्रतोदांच्या बैठकीत किंवा युवकांच्या बैठकीत ‘ही चार आपली तत्त्वं आहेत’,ती घोकून घेतली जायची सगळ्यांकडनं. त्याशिवाय काही त्याच्यावरती फार सविस्तर मांडणी झालेली नव्हती.सविस्तर मांडणी झाली १९७९ साली.आधी काही आप्पांचं लेखन जसं वाचलं, तसं त्याच्यापूर्वी १९७८ साली मोरारजीभाई देसाईंची भेट प्रबोधिनीला झालेली होती.आणि त्यावेळी प्रबोधिनीचा विचार काय मांडायचा नेमका,काल सुभाषरावांच्या भाषणात त्यांनी उल्लेख केला त्याचा, ‘नेतृत्व विकसन’ या विषयावरती आप्पांची आणि मोरारजी देसाईंची बोलाचालीसुद्धा झालेली होती.नेतृत्व विकसित करता येतं का ते जन्मजात असतं या विषयावर.
गेल्या आठवड्यामध्ये आप्पांच्या स्मरणदिनाच्या निमित्ताने दोन-तीन गटांमध्येमी ज्या दोन आठवणी सांगितल्या,त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमात व्यासपीठावर एका वाक्यात प्रबोधिनी कळली पाहिजे मोरारजींना,म्हणून एक वाक्य तयार केलेलं होतं.ते असं होतं की—’धर्मविचार आणि ईशचिंतन यात सनातन्यातील सनातनी, शास्त्र आणि उद्योगविचार यात आधुनिकातील आधुनिक.’आणि वरती ज्ञान प्रबोधिनी—ज्ञान प्रबोधिनी काय आहे? तर ‘धर्मविचार आणि ईशचिंतन यात सनातन्यातील सनातनी’, म्हणजे पूर्व काळापासून, इतिहासाच्या काळापासून यासंबंधी जो विचार चालत आलेला आहे,तो आजही तितकाच उपयुक्त आहे आणि तो टिकवला पाहिजे,असं म्हणणारे म्हणजे सनातनी.’शास्त्र आणि उद्योगविचार यात आधुनिकातील आधुनिक’, हे मात्र सर्व आपल्याला आधुनिक जे काही आहे ते स्वीकारायचं, स्वीकारायला पाहिजे, असं म्हटलेलं आहे.
आणि त्याचवेळी एक छोटं भाषण मोरारजीभाई देसाईंच्या स्वागताचं केलेलं होतं. त्याच्यात ते असं म्हटलेलं आहे की ‘असहकाराच्या चळवळीत ज्या राष्ट्रीय विद्यापीठांची स्थापना झाली,त्यांची जी तीन मूल्ये पायाभूत होती, तीच मूल्ये घेऊन आम्ही काम करतो आहोत.’ हे सांगायचं कारण मी असंही म्हटलं की, मोरारजी देसाई हे आधी आय.सी.एस. अधिकारी होते, कलेक्टर होते. पण गांधीजींच्या चळवळीत राजीनामा देऊन तेही स्वातंत्र्य चळवळीत आले.त्यामुळे त्याचा गांधीजींच्या असहकार चळवळीचा उल्लेख त्यांच्याशी भावनिक नातं जोडण्यासाठी म्हणून केलेला होता,असं आप्पांनी नंतर सांगितलं आम्हाला बैठकीत, की असं का म्हटलं हे.पण मूल्यं ती होतीच राष्ट्रीय विद्यापीठाची. आणि सर्व जुने आणि आधुनिक संत आमचे दैवत आहेत, धर्मविचार आणि ईशचिंतन यात सनातन्यातले सनातनी, याच्यासाठी म्हणून.तथापि स्वामी विवेकानंद यांचे विचार व चिंतन या कार्याच्या मुळाची मूळ स्फूर्ती आहे, ‘Man making education’.आणि मग पुन्हा त्या वाक्याचा उच्चार केलेला आहे की, ‘आपल्या संस्कृतीने दिलेला आध्यात्मिक वारसा, ईश्वरचिंतन म्हणजे मूळ शक्तीचा शोध, उपासना, दैनंदिन चित्तशुद्धी, सदैव कर्मरत असणे,केवळ स्वदेशाबद्दलच नव्हे तर सर्व जगाबद्दल आत्मभान ठेवणे, या सर्व येथील कामाच्या प्रेरणा आहेत.या प्रेरणा घेऊन स्वार्थाचा लेश विचार न करताखऱ्या प्रकारचे आत्मविकसन आणि त्यातून स्वदेश घडण करणारे शेकडो कार्यकर्तेया कार्यातून उभे राहावेत.’म्हणजे व्यक्तिविकास आणि कार्यविकास एकत्र चालतं.
तर व्यक्तिविकास म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मविकसन,आणि कार्यविकास म्हणजे स्वदेशघडण, असा उच्चार इथेही आलेला आहे.ही ७८ साली मांडणी झाली.आणि मग पुन्हा प्रबोधिनीचा जो काही कार्यविस्तार ७७, ७८, ७९ साली युवक विभागाच्या विस्तार शिबिरांच्या निमित्ताने झाला.त्याच्यात ७७ चा डिसेंबर, ७८ चा मे महिना, ७९ चा मे महिना. ह्याच्यात सुरुवातीला चार, मग नंतर सात आणि मग नंतर जवळजवळ ३० अशा जिल्ह्यांच्या ठिकाणी विस्तार शिबिरं एका वेळी झाली.तर त्या सगळ्या ठिकाणचे सगळ्या युवकांना एकत्र बोलवून शिवापूरला त्यांचं शिबिर झालं.जवळजवळ २०० जण त्यांना आलेले होते.’महाराष्ट्र विस्तार शिबिर’ असं त्याला नाव दिलेलं होतं.आणि मग त्यावेळी जी तत्त्वं सांगितलेली होती ६८-६९ साली —’धर्मसंस्थापना’, ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’, ‘संघटनेशिवाय तरणोपाय नाही’ आणि ‘व्यक्तिविकास आणि कार्यविकास’—या चार तत्त्वांवरती चार तेव्हाच्या प्रतोदांनी तयारी करून भाषणं दिली, शिवापूरच्या शिबिरात.आप्पा तेव्हा आजारी होते, ते फारसे आले नाहीत शिबिरात.पण ती सगळी भाषणं नंतर ध्वनिमुद्रित त्यावेळी केलेली होती, आप्पांनी त्याचं ध्वनिमुद्रण ऐकलं.आणि मग त्या त्या वक्त्याशी त्यांनी चर्चाही केली त्याच्याबद्दल.त्यावेळी माझ्याकडे ‘व्यक्तिविकास आणि कार्यविकास’ हा विषय आलेला होता. हा दुसरा खंड१९८० साली प्रकाशित झाला.आणि त्याच्यामध्ये आप्पांनी १९७५ साली एक्सलन्स अवॉर्ड स्वीकारताना जे भाषण केलेलं होतं, त्याच्यामध्ये छापून आलं.त्याच्या आधी ते फारसं प्रसृत झालं नव्हतं.कुठल्यातरी वृत्तामध्ये ते माझ्या सहीने छापलं गेलंय असं मला कळलं.कारण अशी तेव्हा पद्धत होती की आप्पा लिहायचे आणि कुठल्यातरी कार्यकर्त्याच्या नावाने छापायचे.तसं ते माझ्या नावाने वृत्त ते छापलं गेलं होतं.त्या भाषणामध्ये प्रबोधिनीला २०० कार्यकर्ते देशाला द्यायचेत, २०० कार्यकर्ते कसे असावेत,याच्याबद्दल आप्पांनी पहिल्यांदी स्पष्ट मांडणी केली.त्याच्या आधी ते अनेक वेळा आपल्या देशाला २०० कार्यकर्ते द्यायचेत,तुम्ही त्यातले एक होणार का, असं अगदी आठवी-नववीच्या मुलांनाही ते एकेकाला विचारायचे.आणि झालं पाहिजे असं सांगायचे.पण म्हणजे काय करायचं हे गुलदस्त्यात होतंच,किंवा आप्पांच्याही मनात ते हळूहळू स्पष्ट होत होत्या त्या कल्पना त्या. कारण २०० कार्यकर्ते असे मिळाले पाहिजेत हे विवेकानंदांनी आकडा तो बोललेला आहे, म्हणून तो आला आप्पांच्या याच्यावर.असे २०० कार्यकर्ते मिळाले, तर भारतात नंदनवन निर्माण होईल, वगैरे अशा पद्धतीने विवेकानंदांनी म्हटलंय.
तर त्या भाषणामध्ये समता, बंधुता आणि सामाजिक न्याय,विज्ञानातील उत्तमता आणि भारतीय अध्यात्म या पाचही तत्त्वांच्या एकत्रित प्रेरणेतून काम करणारे कार्यकर्ते, असे २०० कार्यकर्ते आम्हाला द्यायचेत,असं भाषणामध्ये आप्पांनी म्हटलेलं होतं.आता त्या भाषणात जर का पाहिलं तर थोडासा वास येतो,की जसं मोरारजी देसाईंशी भावनिक नातं जोडण्यासाठी राष्ट्रीय विद्यापीठं, असहकार आंदोलन उल्लेख केला,तसं त्या काळच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून ते म्हटलेलं आहे की काय. कारण ‘हे सगळं म्हणजे आम्ही समाजवाद म्हणतो’. कारण तेव्हा आणीबाणीचा काळ चालू होता,आणि समाजवाद वगैरे, वीस कलमी कार्यक्रम असं सगळं जोरात चालू होतं.तर त्या वातावरणात कदाचित ते म्हटलंय आप्पांनी, असं वाटलं.पण नंतर जर का पाहिलं,तर ‘राष्ट्रद्रष्टे विवेकानंद’ची नवीन आवृत्ती जेव्हा काढली,त्या नवीन आवृत्तीमध्ये अध्यात्म विचारावर आधारलेली,व्यावहारिक समता आणि बंधुभाव यामुळे सुदृढ असणारी,ज्यामध्ये मुसलमान आणि ख्रिश्चन हे मुसलमानपण आणि ख्रिश्चनपण न सोडता हिंदू म्हणून येऊ शकतात,आणि जे मुळात हिंदूच आहेत ते हिंदुत्वाच्या अभिमानाने रसरसून काम करू लागतात,अशी समाजरचना ज्या दिवशी होईल तो सुदिन.अशी समाजसंस्थापना म्हणजे धर्मसंस्थापना,अशी मांडणी तिथे केली.त्यामुळे धर्मसंस्थापना हे तत्त्व आप्पांच्या डोक्यात पक्कं होतं,पण काळानुसार त्याची काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडणी केली पाहिजे.त्यामुळे धर्मसंस्थापना म्हणजे समाजसंस्थापना, म्हणजेच राष्ट्रघडण,असं एका अध्यापक बैठकीमध्ये ते बोललेले आहेत.
हा सगळा विचार आप्पाच करत होते का फक्त? तेव्हा तर तसंच दिसायचं, कारण अण्णा पूर्ण कामात बुडालेले असायचे.ते कधी काही फार वैचारिक वगैरे असं काही करायचे नाही.पण अण्णांचं एक वैचारिक सापडलं.१९८१ साली केरळमध्ये एक सर्वधर्म परिषद व्हायची होती.त्याच्यासाठी आप्पांनी एक निबंध तयार केलेला होता.तो ‘राष्ट्रदेवो भव’मध्ये आपण छापलेला आहे.पण आप्पा प्रत्यक्ष प्रकृतीच्या कारणाने जाऊ शकले नाहीत.मग अण्णा तिथे गेलेले होते.आप्पांचाही जे निबंध आहे तो ‘धर्म आणि मानव’ अशा शीर्षकाखालीच आहे,आणि अण्णा स्वतः तिथे गेलेले होते.अण्णांचंही तिथे ‘धर्म आणि मानव’ याच विषयावरती भाषण झालं.इंग्रजीत झालं,नंतर ते इथे आल्यावर ‘तरुण भारत’मध्ये त्याचं मराठी भाषांतर छापलं गेलं. ‘व्यक्ती आणि समाज यांच्या ऐहिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाला पोषक होणारी समाजरचना आणि मूल्यरचना म्हणजेच धर्म होय. ‘समाजसंस्थापना आणि धर्मसंस्थापना हा विचार अण्णांनी तिथे मांडलेला आहे.विवेकानंदांच्या राष्ट्रधर्मामध्ये मघाशी ज्या कल्पना सांगितल्या, त्याच्यानंतर तत्त्वज्ञान आणि इतिहास, संस्कृती आणि इतिहास हे सगळं एकत्र चाललं पाहिजे.त्याच्यानंतर शेवट म्हणजे काय,तर विवेकानंदांना आवाहन त्याच्यात केलेलं आहे,की इथे विजयशाली संघटना होऊ द्या.’जे ईश्वरतत्त्व माझ्यात आहे, तेच माझ्या पलीकडच्या बांधवात आहे,हे उमगल्याने त्याला वगळून कोणतेही ऐहिक वा पारमार्थिक भोग भोगण्याची लालसा आमच्या मनात न उरू द्या.’तेच अण्णांच्या भाषणामध्ये, ‘जे जे व्यक्त आणि अव्यक्तही आहे,त्यातून तीच प्रभुशक्ती’ — ईश्वरशक्तीच्या ऐवजी प्रभुशक्ती म्हटलंय—’होत आहे.मानव किंवा अन्य प्राणी, वनस्पती, जगत् इतकेच काय, ज्याला निर्जीव जग समजतो त्यातूनही ते परब्रह्मच प्रकट होत आहे’, असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. हा जो विचार आला की सगळ्यांमध्ये एकच ईश्वरतत्त्व आहे,तोच विचार शेवटी प्रबोधिनीची वैचारिक मूलतत्त्वं मांडताना ‘जनी जनार्दना ऐसा भाव’ अशा रूपामध्ये आलेला आहे.
आप्पा गेल्यानंतर १९८४ साली २५-३० जणांची बैठक झाली. आपण सगळं आता प्रबोधिनीचं काम पुढे न्यायचंय ,त्याच्या मागचा आधारभूत असा विचार काय?आणि त्या बैठकीच्या निमित्ताने त्या बैठकीचा संयोजक मीच होतो, त्यामुळे टिपणं सगळी माझ्याकडे आहेत त्याची. तर प्रबोधिनीचा विचार म्हणून आप्पांनी काय काय म्हटलेलं आहे किंवा आपण काय काय चर्चा केलेल्या आहेत, अशी सगळ्यांनी मूलतत्त्व काय, असं म्हणून चर्चा सुरू केली. त्याच्यात ही चारही होतीच —’संघटनेशिवाय तरणोपाय नाही’, ‘धर्मसंस्थापना’, ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’, ‘व्यक्तिविकास आणि कार्यविकास’.पण आप्पा वेगळ्या कार्यकर्त्यांशी वेगळ्या गोष्टी बोललेले होते किंवा वेगळ्या वैचारिकांमध्ये, कार्यक्रमांच्या वेळी वेगळं सांगितलेलं होतं.त्याच्याशिवाय आणखीन मग त्याच्यामध्ये ‘रूप पालटू देशाचे’ हे आपलं मूलतत्त्व आहे. ‘सहविचारातून नेतृत्व पद्धती’ हे आपलं मूलतत्त्व आहे. ‘ततः किम्’ हे पद्य त्यापूर्वी झालेलं होतं, त्यामुळे ते आपलं मूलतत्त्व आहे.’समाजपुरुषाचे दोन्ही पंख समबळ असले पाहिजेत’ असंही त्याच्यामध्ये आहे.’भाग्यासी काय उणे वीर तत्त्वज्ञ कार्यकर्त्या वाचून राहिले’ असंही ते मूलतत्त्व आहे. ‘1 = 0, 2 = infinity’ हेही आपलं वैचारिक तत्त्व आहे. ‘We want to build bridges across political denominations’ हेही आपलं आहे. ‘एका म्यानात अनेक तलवारी राहिल्या पाहिजेत’ हेही आपलं वैचारिक मूलतत्त्व आहे. ‘सनातन्यातले सनातनी आणि आधुनिकातील आधुनिक’. ‘घडो ज्ञानाचा उद्बोध, भक्तिप्रेमाचा कल्लोळ’—ज्यांनी ज्यांनी जे जे ऐकलेलं होतं कधीतरी आणि लक्षात राहिलं होतं, अशी मोठी यादी तयार झाली. आणि ही सगळी यादी म्हणजे आपले वैचारिक मूलतत्त्व.
उद्या आपण त्याच्यासंबंधी जास्ती बोलणार आहोत.पण ही वैचारिक मूलतत्त्वं असली तर देशाच्या समस्या संपणार आहेत का, सुटणार आहेत?हा आमचा विचार आहे.तर मग कुठल्या समस्या सोडवल्यावर देशाचं रूप पालटणार आहे? शेती, आर्थिक, औद्योगिक, लोकसंख्या, संरक्षण, राजकीय, प्रशासकीय, संघटन, भ्रष्टाचार, निरक्षरता, आरोग्य, शिक्षण, संशोधन, नेतृत्व, हिंदुस्थानचं स्वामित्व, मालक-मजूर संबंध, बेकारी, दारिद्र्य—अशी मोठी यादी.आणि हे मोठी यादी झाल्यावर मग आता हे सगळे विचारांची मांडणी आपल्या करायचा, याचं लेखन कोणी कोणी काय काय करायचं,तर ते प्रथम समस्यांच्या रूपातच शीर्षकं ठरली.जवळजवळ १८ एक लेख त्याच्यात करायला पाहिजेत असं ठरलं.८४ साली ही बैठक झाली,पण हे १८ लेख लिहून घेणे सगळ्यांकडनं म्हणजे हे मोठं कठीण काम होतं.आणि त्यामुळे ते तसंच राहून गेलं.मग १९८७ साली प्रबोधिनीचा रौप्य महोत्सव आला.तर त्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने तरी हे लेखन करूया.तर ही यादी सगळी मोठी होती,तर ती जरा आटोक्यात आणायला पाहिजे होती सगळी.कन्याकुमारीला युवकांचे एक अभ्यास शिबिर झालं. महेंद्रभाई, आपले धनंजय महाराज—रामकृष्ण मठात असतात ते—आणि तेव्हाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आणखीन जे होते ते सगळे,संतोष गोंधळेकर त्याच्यामध्ये होते.स्वरूपवर्धिनीचे दोन कार्यकर्ते आलेले होते.असे आठ-दहा जण मी आणि अण्णा आम्ही कन्याकुमारीला गेलो. काही विवेकानंद विचारांचा अभ्यास झाला, तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलणं, त्यांची भाषणं अशी पद्धती.आणि त्याच्यामध्ये अण्णांनी आणि मी अशा दोन्ही दोघांनीच या साती विषयांवरती पहिली प्राथमिक भाषणं केली.त्या शिबिराला असणाऱ्या कार्यकर्त्यांकडे कदाचित त्याची टिपणं असतील.ते साधारण जुलै महिन्यामध्ये शिबिर झालं.त्या भाषणांमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या मांडलेल्या आहेत त्या आलेल्या आहेत असं वाटलं.तर ते आपल्या दोघांचाच अभ्यास आहे आणि विचार आहे तो पुरेसा नाही,त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना आपण याच्यासंबंधी बोलायला सांगू, असं म्हटलं.आणि मग एक व्याख्यानमाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये झाली.आणि त्याच्यामध्ये या सात शीर्षकांखाली आता जी मूलतत्त्वं म्हणून मांडतोय, त्याच्यात वामनराव, यशवंतराव, रामभाऊ डेंगळे, सुभाषराव, अशोकराव निरफराके यांनी एक एक केलं आणि दोन भाषणं माझी झाली.आणि त्याच्यावरती चर्चा, तासभर भाषण आणि त्याच्यापुढे चर्चा,अशाही पुढे झालं.तर रामभाऊंनीच भाषण करताना, ‘मला हा विषय दिलाय म्हणून मी बोलतोय, पण हे जनी जनार्दन तत्त्व कधी आलं आणि कसं आलं काही मला माहित नाही’, अशी सुरुवात केलेली होती त्यांच्या शैलीमध्ये.आणि म्हणून मी म्हटलं की, ते आधी अगदी बीजरूपाने अण्णांच्या आणि आप्पांच्या याच्यामध्ये होतं, पण स्पष्टपणे मांडलेलं नव्हतं.आता हे वेगवेगळ्या लोकांनी भाषणं केल्यामुळे पुन्हा त्याला फाटे फुटायला लागले विषयात.म्हणून मग ते सगळे एकत्र पुन्हा बांधलं पाहिजे,असं म्हणून रामकृष्ण मठात एक दिवसभराची प्रदीर्घ बैठक झाली.भोजनपूर्व अडीच तास या साती तत्त्वांना एकत्र करणारं एक भाषण माझं झालं,आणि भोजनानंतर अडीच तास त्याच्यावरती चर्चा होऊन आणखीन बारीक-सारीक त्यातले सुटे धागे काय काय करायला पाहिजेत,ते बाजूला केले.मग प्रत्यक्ष त्याचं लेखन हे सगळं लतातार्इंनी केलं.सगळ्या भाषणांची टिपणं, ध्वनिमुद्रणं, माझं केलेलं भाषण.आणि मग सुभाषराव, रामभाऊ, अशोकराव, विसूभाऊ यांनी काही काही लेख तपासले.मग विसूभाऊंनी सगळे पुन्हा त्यांच्या चिकित्सक दृष्टीने सगळे लेख एकत्र पाहिले, तपासले.मी ते एकत्र व्याख्यान केलेलं असल्यामुळे मीही ते सगळे तपासले.आणि मग हे ‘तत्त्वसप्तक’ म्हणून छापलं गेलं.
विसूभाऊंची सूचना होती सगळे साती लेख वाचल्यानंतर,की याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सुटून जातायेत.आणि आपण सोयीसाठी म्हणून आता हे सात शीर्षकांखाली जरी छापलेलं असलं,तरी लिहायला पाहिजे होतं पण ज्याच्यावर अजून लिहिलं गेलं नाही, त्याचा उल्लेख तरी करायला पाहिजे.म्हणून मग ते आठवं उपसंहाराचं प्रकरण हे त्याच्यामध्ये आलेलं आहे.की ज्याच्यावरती प्रबोधिनीची काहीतरी भूमिका मांडायला पाहिजे, पण या सात लेखांमध्ये आली नाही,तर त्याची नोंद करून ठेवावी, की याच्यावरही काहीतरी लेखन झालं पाहिजे किंवा विचार झाला पाहिजे,असं म्हणून ते एक शेवटचं आठवं प्रकरण त्या लेखमालेमध्ये आलेलं आहे.मग याचाच अर्थ तत्त्वसप्तकाची मांडणी ही अपूर्ण आहे.पण आप्पांच्या डोक्यात तो विचार सुरू झाला ५१-५२ साली, ते ८८ साली लेखबद्ध झालं.त्याच्यात आप्पांचा विचार जो होता तो वेगळ्या लोकांनी ऐकला,त्यांनी त्याच्यावरती स्वतःचं चिंतन, अनुभव याच्या आधारे भर घातली.आणि त्यांना जे जसं समजलं तसं त्यांनी मांडलं, असं ते तत्त्वसप्तक आहे.पण तो त्यावेळचा प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचा मूर्धस्थानी असणारा गट होता.तसं आज आपण इथे प्रबोधिनीच्या मूर्धस्थानी असलेले कार्यकर्ते सगळे आहोत.आणि त्यामुळे आज आपल्याला काय हे तत्त्वसप्तक कसं मांडायला पाहिजे,कशाची भर घालायला पाहिजे, काय कमी केलं तर चालेल,आजचे प्रश्न काय, आणि ज्याच्यातून आपल्याला कामाला काहीतरी दिशा मिळेल,असं या विचारांमधून काय मिळणार आहे,असा सगळा आपल्याला विचार करायचाय.तो पुढच्या दीड दिवसांमध्ये होईल.तत्त्वसप्तक म्हणताना ती काळ्या दगडावरची रेघ नाही, हे कळावं याच्यासाठी हे लेख कसे तयार झाले आणि त्याच्यामागे कसा कसा विचार होत गेला,हे आज या सत्रामध्ये थोडक्यात मांडायचा प्रयत्न केलेला आहे.
