प्रबोधिनीच्या सदस्यांनी वारीचा अनुभव घ्यावा असे आपण का सुचवतो?
ज्यांनी वारीचा अनुभव घेतला आहे ते स्वतःच्या अनुभवातून याचे उत्तर देऊ शकतील. मी एका वेळी जास्तीत जास्त अर्धा दिवसच वारीमध्ये सहभागी झालो आहे. पण मी चल-उपासनेचे अनेक प्रयोग करून पाहिले आहेत. त्या आधारे मला उत्तर देता येईल.
पहिला लौकिक हेतू — समाजाच्या एका मोठ्या गटाचे भावजीवन कसे आहे याची ओळख फारसा खटाटोप न करता होते.
दुसरा व्यक्तिगत अनुभव घेण्याचा हेतू — हेलिकॉप्टरने पंढरपूरला एका तासात जाता येईल. त्याऐवजी पायांनी जाण्याने अनेक दिवस पंढरपूरला पोहोचणे हा एकच ध्यास लागल्यावर मनाला चिंतन-स्नान घडते. वारीमध्ये पराक्रमाची भावना नसते. तिथे नम्रतेचा अनुभव घेता येतो. एकट्याने चल-उपासना केली तर मनाला फक्त परमेश्वर-चिंतन-स्नान होते. वारीमध्ये अनेकांसह चल-उपासना होते तेव्हा नम्रतेचाही अनुभव येतो.
प्रबोधिनीचे गट वारीमध्ये एखादा दिवस सहभागी होतात तेव्हा वरील लौकिक हेतूच थोडा फार साध्य होतो. गटातील एका-दुसऱ्याला व्यक्तिगत अनुभव घेण्याचा हेतू लक्षात येतो.
