अनौपचारिक शिक्षण प्रश्न क्र. ३२

नेतृत्वविकसनासाठी अग्रणी-योजनेत काय केले पाहिजे?

आपल्या सुवर्णामृत भवितव्य लेखाच्या परिशिष्टामध्ये आपण नेतृत्वगुणांची यादी दिली आहे. प्रशिक्षण कार्यक्रम आखणाऱ्यांनी त्या गुणांच्या विकासासाठी अग्रणींचे वय पाहून कार्यक्रम ठरवावा. पण त्याशिवाय काही सामान्य (general) व विशेष (specific) उदाहरणे अग्रणींच्या समोर ठेवायला हवीत. सामान्य उदाहरणे म्हणून मी काही कामांचा उल्लेख बऱ्याचदा करतो.

पूर्वीच्या शिडांच्या जहाजांमध्ये डोलकाठी म्हणून मोठा खांब असायचा. त्यावर चढले की जास्त लांबवरचे दिसायचे. इतर जहाजे, किनारा, क्षितिजावरचे ढग बघण्यासाठी टेहळणीचे काम कोणीतरी वर चढून करायचे. नेत्याला असे दूरवरचे निरीक्षण करणाऱ्या टेहळ्याचे काम करावे लागते.

होडीची दिशा स्थिर ठेवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी सुकाणू पक्के धरावे लागते. नेत्याला सुकाणू धरण्याचे काम करावे लागते. नेत्याला गटाच्या वतीने अडचणी, प्रश्न, योजना, संकल्प व प्रतिक्रिया इतरांना सांगाव्या लागतात. त्यासाठी नेत्याला चांगला प्रवक्ता बनावे लागते. कोणालाही मार्ग सुचत किंवा दिसत नसताना नेत्याला अनिश्चित परिस्थितीत जोखीम पत्करून सर्वांपुढे होऊन वाट काढणारा किंवा वाट बनवणारा व्हावे लागते. कधी गटातल्या सर्वांना कामे करू देऊन मागे थांबून कमी पडेल तिथे गाळलेल्या जागा भरण्याचे काम नेत्याला करावे लागते.

टेहळ्या, सुकाणू धरणारा, प्रवक्ता, वाट काढणारा आणि गाळलेल्या जागा भरणारा ही नेत्याच्या विविध वेळच्या कामांची सामान्य उदाहरणे झाली. अग्रणींना गुणांची यादी सांगण्याआधी या भूमिका सांगून कोणत्या प्रसंगी कोणती भूमिका करायची याचा विचार व प्रयोग करायला सांगूनही त्यांचे चांगले नेतृत्वविकसन होऊ शकेल.