नेतृत्वगुण विकसन आधी होते की बुद्धिमत्तेचा विकास आधी होतो ?

अनौपचारिक प्रश्न क्र.३३

नेतृत्वामध्ये मला किमान तीन पैलू दिसतात.
१) किती जणांचे नेतृत्व करायचे ?
२) किती काळासाठी नेतृत्व करायचे ? आणि
३) विशिष्ट विषय किंवा क्षेत्रामध्ये नेतृत्व करायचे की संपूर्ण जीवनव्यापी नेतृत्व करायचे ?

पहिल्या पैलूच्या विकासासाठी सामाजिक प्रज्ञा किंवा आंतर-व्यक्तिगत बुद्धिमत्ता लागते. दुसऱ्या पैलूच्या विकासासाठी स्व-विषयक प्रज्ञा किंवा अंतर्व्यक्तिगत बुद्धिमत्ता लागते. तिसऱ्या पैलूच्या विकासासाठी विविध विषय किंवा क्षेत्रांमधील आकलन, ज्ञान, समस्यापरिहार शक्ती, निर्णयशक्ती व प्रतिभा लागते.

प्रश्न विचारताना पहिल्या पैलूसाठी आवश्यक ते ‘नेतृत्वगुण’ व तिसऱ्या पैलूसाठी आवश्यक ती ‘बुद्धिमत्ता’ असे गृहीत धरलेले दिसते. मला ‘नेतृत्वगुणा’चा (म्हणजे पहिल्या पैलूचा) विकास व ‘बुद्धिमत्ते’चा (म्हणजे तिसऱ्या पैलूचा) विकास हे दोन्ही परस्परपूरक वाटतात. प्रत्येक व्यक्तीनुसार आधी काय होते व नंतर काय होते हे बदलू शकेल.

ज्याला नेतृत्व करावे लागते, त्याला या दोन्हीबरोबर स्व-व्यवस्थापन, स्व-परीक्षण, स्व-परिवर्तन हे सर्व करावे लागते. त्यासाठी एखादा गट समोर नसताना आणि क्षेत्रनिश्चित झालेले नसताना सुद्धा स्व-विषयक प्रज्ञेचा (म्हणजे दुसऱ्या पैलूचा) विकास करत राहायला हवे. प्रत्यक्ष नेतृत्व मात्र गट आणि उद्दिष्ट समोर असतानाच होते.