विसुभाऊ आणि सुभाषरावांच्या पंचाहत्तरी निमित्त झालेल्या कृतज्ञता सोहळ्यातील विसूभाऊंचे मनोगत

सौर दि. कार्तिक ३० शके १९४८ २१ नोव्हें. २०२६ ①

ज्ञानप्रबोधिनीचे आदरणीय संचालक मा. गिरीशराव, आजच्या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती असलेले माझे सुहृद मा. सुभाषराव, ह्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मा. अजितराव, संयोजन-समितीचे सर्व सदस्य आणि प्रबोधिनीवरील प्रेमामुळे येथे जमलेले सर्व हितचिंतक व कार्यकर्ते

माझ्या स्वरयंत्रात काही दोष असल्यामुळे मी प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा माझे मनोगत लिहून द्यावे अशी मला सोयीची असलेली सूचना मा. अजितरावांनी केली ह्याबद्दल प्रथम त्यांना धन्यवाद आणि माझे मनोगत वाचून दाखवणाऱ्या व्यक्तीलाही धन्यवाद. कोण वाचून दाखवणार ह्याची निश्चित स्वरूपाची माहिती नसल्यामुळे मी नामोल्लेख टाळला ह्याबद्दल क्षमा असावी.

मी आणि मा. सुभाषराव ह्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना जेव्हा अजितरावांनी मला सांगितली तेव्हा माझी लगेचची प्रतिक्रिया अशी होती की, “अहो, अजितराव प्रबोधिनीत अशी काही पद्धत नाही. तुम्ही कशासाठी हा उद्योग करत आहात?” पण माझ्या ह्या प्रतिक्रियेवर त्यांनी हसत हसत सुभाषरावांची प्रतिक्रिया सांगून लगेच विषय बदलला. मला वाटलं होतं की बहुतेक ते त्यांची ही अभूतपूर्व कल्पना सोडून देतील. पण मी मानसशास्त्रात कच्चा पडलो आणि “जिथे जायचे ठरले तेथे आम्ही जाऊच जाऊ” ह्या प्रबोधिनीतील पद्याचा जबरदस्त संस्कार अजितरावांवर झाला असल्याने त्यांनी माझ्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करून WhatsApp च्या अनेक गटांवर निमंत्रणपत्रिका पाठवून दिली. हे पाहिल्यावर “तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते पहावे” असं करण्यावाचून आता गत्यंतर नाही हे मला कळून चुकलं. त्यांनी आणि त्यांना साथ देणाऱ्या संयोजनसमितीमधील सर्वांनी मा. संचालकांची संमती घेतली असावी अशी शक्यता आहे. पण मा. गिरीशरावांची प्रसिद्धीपराङ्मुखता पाहता जर तेही त्यांनी केलं नसेल तर ईश्वर त्यांना क्षमा करो! अजितरावांच्या भेटीनंतरचे एक दोन दिवस मी ह्याप्रकारे विचार करत होतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की कदाचित् मी चुकीच्या पद्धतीने विचार करत असेन. मी आणि सुभाषराव हे दोघेही केवळ निमित्तमात्र आहोत, खरं तर आमच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने ज्ञानप्रबोधिनी ह्या गुरुकुलाविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे, ह्या गुरुकुलातील कार्यकर्ताघडणीची प्रक्रिया अनेकांच्या समोर उलगडली जावी अशी कल्पना ह्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या मागे असेल अशीही शक्यता आहे. हा विचार मनात आल्यावर माझ्या मनातील अस्वस्थता थोडी कमी झाली आणि मग एखादा चित्रपट पाहावा त्याप्रमाणे माझ्या जीवनातील सुमारे बासष्ट वर्षांच्या कालखंडातील विविध प्रसंग मी ह्या दृष्टीने पाहू लागलो.

शाळेतील जन्मदिनांकाच्या नोंदीनुसार माझं सध्या ७७ हे वयवर्ष चालू आहे. मी १४-१५ वर्षांचा असताना प्रबोधिनीत आलो. त्यावेळी आम्ही सदाशिव पेठेत राहत होतो. घरून प्रबोधिनीत चालत जायला मला फार तर दहा मिनिटे लागायची. मी नूमविचा विद्यार्थी होतो. आम्ही शाळेत असताना प्रबोधिनीची पूर्ण वेळची शाळा सुरू झाली नव्हती. संध्याकाळी वर्ग होत असत आणि त्याला प्रबोधशाळा असं म्हणत. प्रबोधिनीचे संस्थापक कै. डॉ. वि. वि. पेंडसे, ज्यांना आम्ही आप्पा म्हणत होतो, व प्रबोधिनीचे द्वितीय संचालक कै. डॉ. व. सी. ताम्हनकर, ज्यांना आम्ही अण्णा म्हणायचो, पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे पहिले प्राचार्य कै. यशवंतराव लेले, ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी केंद्राचे प्रवर्तक आणि पहिले प्रमुख कै. वामनराव अभ्यंकर, असे ज्ञानप्रबोधिनीच्या पहिल्या पिढीचे समर्थ कार्यकर्ते आम्हाला प्रबोधशाळेत शिकवत होते. मी नूमविच्या व्हॉलिबॉलच्या आणि खोखोच्या संघात होतो. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आमचा सराव चालत असे. त्यानंतर मी प्रबोधशाळेत जायचो. पण नंतर मला कळलं की प्रबोधिनीतही संध्याकाळी खेळ घेतले जातात. त्यामुळे आम्हाला खो-खो, व्हॉलिबॉलचं मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडाशिक्षकांची अनुमती घेऊन मी कधी कधी प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचे खेळ जिथे चालत होते त्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर जाऊ लागलो. माझे तीन थोरले भाऊ उत्तम क्रीडापटू होते. त्यांचं पाहून मलाही खेळाची आवड निर्माण झाली होती. अप्पांनी सुद्धा मला दोन्ही ठिकाणी खेळण्याची अनुमती दिली होती. प्रबोधिनीत संध्याकाळी खेळानंतर इंग्रजी, गणित इ. शिकविण्याचे जे वर्ग होत असत त्यात भूमितीच्या तासाच्या वेळी रायडर्स दिली जायची. पुण्यातील वेगवेगळ्या नामवंत शाळांमधील बुद्धिमान विद्यार्थी प्रबोधशाळेत एका वर्गात असल्यामुळे रायडर्सची सिद्धता करण्याबाबत अहमहमिका किंवा स्पर्धा असायची. त्यात रंगून गेलो की वेळेचे भान राहत नसे, त्यामुळे वर्ग संपल्यानंतर सुद्धा काही वेळ बसून आम्ही ती रायडर्स सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे प्रबोधिनीतून घरी जायला मला अनेकदा उशीर होत असे. ही गोष्ट कै. अप्पांच्या लक्षात आली होती. नंतर बहुतेक मी इ. ९ वीत असताना आम्ही सदाशिव पेठेतून एरंडवण्यात सध्या आम्ही राहतो तिथे राहायला गेलो. माझ्याकडे सायकल नव्हती. त्यामुळे माझा मोठा भाऊ स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरून त्याचा सराव संपवून नंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये येऊन त्याच्या सायकलवरून मला घरी नेऊ लागला. त्यामुळे स्वाभाविकपणे मी आमचे वर्ग संपल्यावर लगेच घरी जाण्यासाठी निघायला सुरुवात केली. माझ्या वर्तनातील हा बदल अप्पांच्या लक्षात आला. त्यांनी माझ्याकडे चौकशी केल्यावर आम्ही घर बदलल्याचे त्यांना कळलं. एक दिवस ते आमच्या घरी आले आणि त्यांनी आमच्या घरातल्या मोठ्यांना भेटून अप्पा जिथे रहात होते तिथे मी राहायला यावे असं सुचवलं. माझ्या आईला प्रारंभी ते मान्य नव्हतं पण माझ्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून तिने नंतर ते मान्य केलं. मी नववीच्या शेवटी किंवा दहावीत असताना अप्पांच्या घरी राहायला आलो. प्रबोधिनी हे तुमचं दुसरं घर आहे असं अप्पा अनेकदा म्हणत असत पण त्याचं असं प्रत्यंतर येईल ह्याची कल्पनाही मी केली नव्हती. माझ्याप्रमाणे रामभाऊ (डिंबळे) आणि अशोकराव (निरफराके) हे सुद्धा अप्पांच्या घरी रहात होते. प्रबोधिनी हा इतर क्लासेसप्रमाणे केवळ एक क्लास नाही तर त्यापेक्षा वेगळं असं काहीतरी आहे हे हळूहळू आम्हाला त्या बालवयात कळण्याच्या दृष्टीने ज्या अनेक घटना कारणीभूत झाल्या त्यात ही घटना माझ्या दृष्टीने महत्त्वाची होती.

प्रबोधिनी हा केवळ क्लास नाही ह्याची पहिली खूण म्हणजे तिथे शिकण्यासाठी ठराविक शुल्क नव्हतं, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची खूण म्हणजे मुलांच्या चांगल्या शिक्षणाच्या आड येणाऱ्या कोणत्याही समस्येवर उत्तर शोधून कार्यवाही करण्याची जिद्द अप्पांच्यात होती.

माझे सगळ्यात थोरले बंधू आणि कै. यशवंतराव (लेले) हे समवयस्क होते. यशवंतरावांच्या प्रमाणे माझ्या थोरल्या बंधूंचेही अध्ययन-अध्यापनाचे विषय मराठी आणि संस्कृत हे होते.
मा. यशवंतराव अनेकदा आमच्या घरी आले होते पण त्यावेळी मुख्यतः माझ्या थोरल्या बंधूंशीच त्यांच्या गप्पा होत असत किंवा ते एकत्र अभ्यास करत असत. प्रबोधिनीत माझी निवड झाल्यानंतर त्यांचा आणि माझा अधिक संबंध येऊ लागला. यशवंतराव त्यावेळी वैदिकाश्रमात रहात होते. त्यांच्या घरासमोरच्या अंगणात गुलाबी पेरूचं झाड होतं. एकदा त्यांनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं. त्यांच्या हाताला आलेले दोन चार पेरू त्यांनी मी घरी निघत असताना दिले. नंतर पुन्हा एकदा त्यांच्या घरी गेलो असताना त्यांनी मला विचारलं की तुला झाडावर चढता येतं काय? मी हो म्हणालो तेव्हा ते म्हणाले ही पिशवी घेऊन जमतील तेवढे पेरू काढतोस काय? मी लगेचच पिशवी घेऊन बरेच पेरू काढले आणि पिशवीत भरून त्यांना पिशवी देऊ लागलो. तेव्हा ते म्हणाले हे पेरू तुमच्या घरातल्या सर्वांना देण्यासाठी घेऊन जा. मला संकोच वाटतो आहे असं पाहून त्यांनी थोडे पेरू घेऊन बाकीचे पेरू मला घेऊन जाण्यास सांगितले. ह्या एका घटनेने आमच्यात एक नवीन नातं तयार झालं. विद्यार्थ्यांना घेऊन देशभर वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासदौरे काढण्याची हौस यशवंतरावांना होती. गोवा, ईशान्य भारत, तमीळनाडू अश्या अनेक प्रांतांमध्ये त्यांनी प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नेलं होतं. त्यांच्याबरोबर जाऊन मी जे अभ्यासदौरे केले त्यातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. “अभ्यास देशस्थितिचा समतोल चालो” अशी एक ओळ प्रबोधिनीच्या दैनंदिन प्रार्थनेत आहे. ह्या ओळीचा अर्थ त्या अभ्यासदौऱ्यांमधून उलगडत गेला, अधिकाधिक ठसत गेला. मराठी बोलताना मधे मधे इंग्रजी शब्द वापरण्याची संवय आपल्यापैकी बहुतेकांना असते. अशी वाक्ये ऐकल्यावर अनेकदा यशवंतराव त्यातील इंग्रजी शब्दाच्या ऐवजी चपखल मराठी शब्द वापरून “असं तुम्हाला म्हणायचं आहे काय?” असं हसत हसत विचारायचे. प्रारंभी अनेकदा तो आमच्यातील चेष्टामस्करीचाही विषय होत होता पण नंतर आम्हाला त्यामागील त्यांची भूमिका कळत गेली. एकूणच चाकोरीबाहेर जाऊन स्वतंत्रपणे मूलभूत विचार करणे, कोणत्याही विषयात सखोल बुडी मारणे ही यशवंतरावांची स्वभाववैशिष्ट्ये होती आणि तशा संवयी आम्हालाही लावण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

रमणबाग ह्या शाळेत यशवंतराव हे पूर्णवेळ शिक्षक होते. तथापि प्रबोधिनीचं काम पूर्णवेळ करता यावे ह्यासाठी ज्याप्रमाणे अप्पा, अण्णा, उषाताई ह्यांनी पुणे विद्यापीठातील नोकरीचा त्याग केला त्याप्रमाणे यशवंतरावांनी रमणबागेतील आणि वामनरावांनी नूमवीतील नोकरीचा त्याग केला. अप्पा, अण्णा ह्यांनी विवाह केला नव्हता पण प्रपंच करणाऱ्या यशवंतराव, तसेच उषाताई ह्यांनी शासकीय नोकरीचा त्याग करून प्रबोधिनीच्या कामाला वाहून घेण्याचा निर्णय करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यांच्या ह्या निर्णयाला कुटुंबातील इतर व्यक्तींची साथ असणं हेही तितकेच अवघड काम आहे. पहिल्या पिढीतील ह्या पाचही व्यक्तींनी अशा रीतीने चांगल्याप्रकारे चालू असलेल्या नोकरीचा त्याग करून प्रबोधिनीच्या कामाला पूर्णपणे वाहून घेतले. ह्यातून त्यांची जी ध्येयनिष्ठा दिसून आली तिचा खूप सखोल परिणाम आमच्या मनावर झाला. दुसऱ्या पिढीतील कार्यकर्ते घडण्याच्या प्रक्रियेत अश्या घटनांचं महत्त्व नक्की आहे.
यशवंतराव हे पुण्यातील ज्ञा. प्र. प्रशालेचे पहिले प्राचार्य. त्यावेळी फक्त मुलांसाठीची प्रशाला होती. C.B.S.E शी संलग्न असण्यासाठी बोर्डाची लेखी मान्यता मिळणं आवश्यक होतं. तसा अर्ज केल्यावर बोर्डाचे काही अधिकारी तपासणीसाठी आले होते. मान्यतेसाठी जे अनेक प्रकारचे नियम होते त्यावर बोट ठेवून मान्यता न देणं हे त्यांना सहजपणे शक्य होतं. पण जेव्हा त्या अधिकाऱ्यांची आणि ज्ञा. प्र.च्या पहिल्या पिढीतील ह्या कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट होऊन चर्चा झाली तेव्हा ते अधिकारी चकित झाले. त्यांनी त्यांच्या अहवालात म्हटले की ह्या लोकांकडे स्वतःच्या मालकीची जागा आणि इमारत नाही, शिक्षकांना पुरेसे वेतन देण्याची आर्थिक क्षमता नाही तथापि त्यांच्या मनात मोठी स्वप्ने आहेत आणि ती साकार करण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याची जिद्द आणि चिकाटी आहे. त्यामुळे ह्यांना सशर्त मान्यता द्यावी. ज्या अटी घालून तात्पुरती मान्यता मिळाली त्या सर्व अटींची पूर्तता दिवसरात्र मेहनत करून पहिल्या पिढीतील कार्यकर्त्यांनी केल्यामुळे पुण्यातील प्रशाला सुरू झाली. ह्या सर्व घटनांचा सखोल परिणाम दुसऱ्या पिढीतील आम्हा कार्यकर्त्यांवर होत होता आणि त्यातून आमची कामाविषयीची बांधिलकी दृढ होत होती.

मी सांगितलेल्या ह्या घटना अनेकांना माहीत असतील. पण केवळ घटनांची माहिती देणं हा माझ्या मनोगताचा हेतू नसून त्या घटनांच्या माध्यमातून त्यात असलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम आमच्यावर कसा झाला हे सांगणं आणि त्यातून कार्यकर्ताघडणीची जी प्रक्रिया प्रबोधिनीत सहजपणे वापरली गेली तिचा गाभा काय ह्याविषयी माझी भूमिका मांडणे हा ह्या मनोगताचा हेतू आहे. उपक्रमांची माहिती हा ह्या प्रक्रियेतील स्थूल स्वरपाचा बाह्य भाग आह. ते उपक्रम करणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची वैचारिक भूमिका हे ह्या प्रक्रियेचे आंतरिक स्वरूपाचे आणि सूक्ष्म घटक आहेत.

गेल्या साठ बासष्ट वर्षांमधील अनेक घटना मनासमोर तरळत असल्या तरी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी विस्तार करणं टाळतो. वाचासुखी परमेश्वर असा वाक्प्रचार मराठीत आहे. त्याचा अर्थ आणि संदर्भ वेगळा असला तरी पहिल्या पिढीतील ह्या पाचही व्यक्तींच्या जीवनातून आम्हाला गीतेतील दैवी गुणसंपदा असलेल्या व्यक्तींचा सहवास लाभला आणि राष्ट्रासाठी जीवन समर्पित करण्यात जीवनाची सार्थकता आहे हे मनावर ठसलं. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळाली. मा. सुभाषराव हे माझ्या पिढीतील कर्तृत्वसंपन्न कार्यकर्ते आहेत. शालांत परीक्षेत गुणांच्या दृष्टीने पहिल्या तीस विद्यार्थ्यांमध्ये असण्याचं यश त्यांच्या गाठीशी असताना सुद्धा शास्त्रशाखेकडून कलाशाखेकडे जाण्याचा निर्णय घेऊन त्यांनी प्रबोधिनीतील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलल्या. वानप्रस्थाच्या पारंपरिक संकल्पनेत वनामध्ये अनासक्त जीवन जगणं हे अभिप्रेत होतं पण वनात राहण्याऐवजी जनात म्हणजे लोकांमध्ये राहूनही अनासक्त बुद्धीने लोकोपयोगी कामे करता येतात हे त्यांनी दाखवून दिलं आहे. प्रबोधिनीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये महत्त्वाची कामे करून गेली अनेक वर्षे ग्रामीण लोकांच्या विकासासाठी आणि प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांच्या घडणीसाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला हे पैशाला सर्वस्व मानणाऱ्या अनेक युवकयुवतींसाठी अनुकरणीय उदाहरण आहे. त्यांच्यासारख्या अनेक युवकयुवतींच्या अशा कामांमधून समर्थ भारताची निर्मिती होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो.

कर्तबगार असणाऱ्या विवाहित पुरुषाच्या मागे वेगळ्या प्रकारे कर्तबगार असणाऱ्या स्त्रीचा आणि काही जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा आधार असतो. अविवाहित पुरुषही तेव्हाच कामात मग्न राहू शकतात जेव्हा त्यांच्या जवळच्या नात्यातील कुटुंबाचा आणि जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा आधार त्यांना मिळतो. माझ्या सुदैवाने माझे थोरले बंधू श्री. सतीशचंद्र आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब यांचा मला कायमच आधार मिळाला. प्रबोधिनीतही युवकविभाग, प्रशाला, मध्यवर्ती अर्थकार्यालय, संत्रिका ह्या विभागांमध्ये मी जे काही थोडंफार योगदान करू शकलो ते तेथील समर्पित सदस्यांच्या सहकार्यामुळेच. ह्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता मी ह्या निमित्ताने व्यक्त करून माझे हे मनोगत संपवतो. धन्यवाद.