तनमनधनपूर्वक काम करणे आणि उत्तरदायी राहून काम करणे या गोष्टी जमायला बराच वेळ लागेल. तोपर्यंत रोज काय करायचे ?
रोज काय करायचे हे प्रत्येकाने स्वतःच प्रयोग करत ठरवायला लागेल. सर्वसामान्य प्रबोधिनीपण आणि विशेष प्रबोधिनीपण स्वतःमध्ये बाणविण्याचा प्रयत्न चालू ठेवला तर रोज काय करायचे हे स्वतःलाच सुचत जाईल.
दिशादर्शक म्हणून पुढील काही गोष्टी सुचवता येतील. त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी जमवण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे.
प्रबोधिनीचा प्रतिज्ञित उत्तरदायी घटक म्हणून –
१.वार्षिक मनोगताच्या रूपात किंवा अन्य पद्धतीने संचालकांना आपल्या वार्षिक कामाचे निवेदन आपण करतो का? २. आपली व्यक्तिगत दैनंदिन उपासना आणि सामूहिक साप्ताहिक उपासना होते का? ३. प्रबोधिनी-प्रणीत संस्कार पोथ्या, कालदर्शिका आपल्या घरी व कामाच्या ठिकाणी आहेत का? आपण त्यांचा विचार करतो का? इतरांना त्याबद्दल सांगतो का ? ४. नियुक्त कामाशिवाय इतर वेळात प्रबोधिनीच्या कामाची स्वतः माहिती घेणे, इतरांना माहिती देणे, विविध उपक्रमांना उपस्थित राहणे, इतरांना उपक्रमांची निमंत्रणे आपणहून देणे, इतर कार्यकर्त्यांच्या कामात आपणहून मदत करणे असा आपला उत्स्फूर्त सहभाग असतो का ? ५. प्रबोधिनीतील नियुक्त किंवा स्वीकृत कामात आपण दक्षता, उत्तमता, उत्कटता, सामूहिक कृती यासाठी जाणीवपूर्वक आपण प्रयत्न करतो का?
राष्ट्रसेवा आणि धर्मसंस्थापनेचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणून –
१. प्रबोधिनीतील सदस्यांना व बाहेरील नागरिकांना आपण निःस्वार्थ काम, सामाजिक काम, उपासना व प्रतिज्ञा यांना उद्युक्त करतो का? २. वाचन, श्रवण, चर्चा, प्रवास, लेखन या पैकी एक किंवा अधिक पद्धतींनी अपण देशस्थितीचा अभ्यास करतो का? ३. प्रबोधिनीने आदर्श म्हणून स्वीकारलेल्या राष्ट्रपुरुषांचे जीवन, कार्य आणि विचार आपल्याला अधिकाधिक समजत जावेत यासाठी आपला प्रयत्न असतो का?
४. आपल्या दैनंदिन व्यवहारात प्रबोधिनीपण वाढावे यासाठी यापेक्षा वेगळे किंवा याहून अधिक प्रश्न आपण स्वतःच स्वतःला विचारू शकतो.
प्रतिज्ञा स्वयंअनुशासन वाढविण्यासाठी आहे बाहेरून लादलेली शिस्त वाढविण्यासाठी नाही.
द्वितीय प्रतिज्ञा
चराचरातून आणि स्वतःमधून विकसणाऱ्या परब्रह्मशक्तीचे स्मरण करून
आणि मला जे जे प्रिय आहे त्या सर्वांचे स्मरण करून
मी अशी प्रतिज्ञा करतो/करते की,
राष्ट्रसेवेचा आणि धर्मसंस्थापनेचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणून
मी ज्ञान प्रबोधिनीचा प्रतिज्ञित घटक होत आहे.
प्रबोधिनीचे कार्य मी तनमनधनपूर्वक उत्तरदायी राहून आयुष्यभर करीन.