औपचारिक शिक्षण प्रश्न क्रमांक २५

२५ : भवितव्य लेखाच्या साध्य-सूत्रात शिक्षण-प्रणाली ऐवजी मनुष्यघडणीची प्रणाली असा बदल शेवटच्या क्षणी का केला? शिक्षण आणि मनुष्यघडण याचा एकच अर्थ आहे ना ?

भाषांतर:

“ज्याने मनुष्यघडण होते ते शिक्षण” हे मनात स्पष्ट असेल, तर शिक्षण आणि मनुष्यघडण याचा एकच अर्थ आहे. व्यवहारात शिक्षण म्हणजे क्रमिक शिक्षण, म्हणजेच शाळा-महाविद्यालयातील शिक्षण, म्हणजेच प्रमाणपत्र-पदविका-पदवी देणारे शिक्षण, म्हणजेच नोकरी देणारे शिक्षण, असा संकुचित अर्थ नकळत रूढ होत गेला आहे.

आपण मनुष्यघडण या अर्थाने ‘शिक्षण’ शब्द वापरायचा आणि ऐकणाऱ्यांनी किंवा वाचणाऱ्यांनी तो रूढ संकुचित अर्थाने घ्यायचा असे बऱ्याच वेळा घडले आहे व घडते. हे टाळण्यासाठी ‘व्यक्तिमत्त्व-विकसन’ हा शब्द पण आपण वापरून पाहिला. ‘छात्र प्रबोधन’चा विस्तार म्हणजेच व्यक्तिमत्त्व-विकसनाची चळवळ असे वर्णनही आपण करतो. पण दुर्दैवाने करीअर-पद-प्रतिष्ठा-स्कोप साठी क्रमिक शिक्षण पुरत नाही, त्यासाठी अभिव्यक्ती कौशल्ये, सामाजिक कौशल्ये, मानसिक-बौद्धिक कौशल्ये पण हवीत, म्हणून व्यक्तिमत्त्व-विकसन झाले पाहिजे असेच बरेच जण समजतात. खरे तर आत्मिक विकसनासह वरील सर्व कौशल्यांचा विकास म्हणजे व्यक्तिमत्त्व-विकसन. परंतु त्याचाही अर्थ लोकांनी संकुचित करत नेला व आत्मिक विकसन त्यातून वगळले.

मनुष्यघडणीमध्ये आत्मिक विकसनही येते. प्रेरणात्मक विकास हे आत्मिक विकसनाचे किंचितसे दृश्य लक्षण आहे. प्रेरणा व्यापक, सखोल व स्वयंनिर्भर होणे हे मनुष्यघडणीमध्ये आणि नेतृत्वगुणविकसनामध्ये मूलभूत आहे. त्याकडे दुर्लक्ष होऊ नये, उलट ते विचाराच्या केंद्रस्थानी यावे, म्हणून ‘शिक्षण-प्रणाली’ ऐवजी ‘मनुष्यघडणीची प्रक्रिया’ असा बदल केला.